मुंबईची ‘पिगी बँक’ आणि दोन भावांची ‘विमा पॉलिसी’!
Articlesसकाळची वेळ रम्यासाठी नेहमीच धावपळीची असते, पण आज त्याच्या घरात एका वेगळ्याच ‘बजेट’ची चर्चा सुरू होती. निमित्त होतं मुलाचा वाढदिवस आणि टेबलावर ठेवलेली त्याची ती छोटीशी गुलाबी पिगी बँक. दोन वर्षांपासून रम्याचा मुलगा त्यात मोठ्या आशेने नाणी टाकत होता. कधी पाहुण्यांनी दिलेली चिल्लर, तर कधी खाऊचे उरलेले पैसे. मुलाने आज ती बँक हातात घेतली आणि निरागसपणे विचारलं, "बाबा, आज वाढदिवस आहे ना... आज फोडूया का?" रम्याने हसून मुलाच्या डोक्यावर हात ठेवला, पण त्या गुलाबी पिगी बँकेकडे पाहताना त्याला अचानक मुंबई महानगरपालिकेच्या त्या भव्य इमारतीचा भास झाला. त्याला राहून राहून वाटत होतं की, आपण सामान्य मुंबईकर म्हणजे त्या पिगी बँकेत पडलेलं एक बिचारं 'नाणं' आहोत. आपलं काम फक्त टॅक्स आणि मतांच्या रूपाने आत पडताना 'खणखण' आवाज करणं आणि त्या बँकेच्या पोटाची खळगी भरणं. ती बँक फोडून त्यातला मलिदा नक्की कोण खाणार, हे मात्र कधीच ते 'नाणं' ठरवू शकत नाही. पिगी बँक भरते ती बाहेरून येणाऱ्या नाण्यांनी, पण ती फुटते तेव्हा मात्र मालकाची दिवाळी असते. गेल्या कित्येक वर्षांपासून ही 'मुंबई नावाची पिगी बँक' भरण्याचं काम सामान्य माणूस करतोय, पण त्याच्या वाट्याला मात्र रस्ते की खड्डे आणि पाणी की गढूळ पाणी, हे प्रश्न कायमचेच उरले आहेत. रम्या विचार करू लागला, सध्या जे दोन भावांच्या एकत्र येण्याचे वातावरण तयार झाले आहे, ती खरंच युती आहे की स्वतःच्या राजकीय अस्तित्वाचा उतरवलेला एक 'विमा' (Insurance)? जेव्हा उद्धव ठाकरेंची सत्ता संकटात होती, तेव्हा राज ठाकरे दूरून टोमणे मारत होते आणि जेव्हा राज ठाकरेंचं इंजिन रुळावरून घसरलं होतं, तेव्हा उद्धव ठाकरे मिश्किलपणे हसत होते. पण आज मात्र दोन्ही भावांना समजलंय की, जर भाजप महायुतीच्या 'विकास मॉडेल'ला हरवायचं असेल, तर पुन्हा एकदा तीच जुनी 'भावनिक क्लृप्ती' वापरावी लागेल. ज्यांनी स्वतःची घरं भरण्यासाठी मुंबईची प्रगती १० वर्ष मागे नेली, ते आता मुंबईला काय न्याय देणार? हा प्रश्न रम्याला अस्वस्थ करत होता. ही दोन्ही भावंडं जेव्हा एकमेकांवर तुटून पडत होती, तेव्हा त्यांना मराठी माणसाची किंवा अस्मितेची आठवण आली नाही. पण आता जेव्हा तिसऱ्याच कोणाकडे तरी या महापालिकेच्या तिजोरीची 'किल्ली' जाण्याची चिन्हं दिसू लागली आहेत, तेव्हा मात्र भावांना भावांची आठवण येऊ लागली आहे. ही 'स्वार्थासाठी' झालेली युती आहे, हे सांगायला कुणा राजकीय तज्ज्ञाची गरज नाही. ही युती म्हणजे स्पष्ट संदेश आहे की "माझी पिगी बँक मला परत हवी, मग त्यासाठी कोणाशीही हातमिळवणी करावी लागली तरी चालेल." रम्या घराबाहेर पडला तेव्हा समोर तोच फलक होता- “मराठी माणसा जागा हो… ही तुझ्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे.” ते वाचून रम्याला हसू आलं. त्याला वाटलं, समोरच्या भिंतीवर जर असं कल्पित बॅनर असतं की, “मुंबईकरांनो, आमचा फॅमिली बिझनेस सध्या तोट्यात आहे, कृपया आम्हाला मतदान करून पुन्हा एकदा आमची जहागीरदारी प्रस्थापित करा!” तर ते किती प्रामाणिक वाटलं असतं. किंवा त्यापेक्षाही स्पष्टपणे तिथे असं लिहायला हवं होतं की- “मुंबईकरांनो, ही आमच्या 'पिगी बँके'ची शेवटची लढाई आहे, कृपया नाणी टाकायला विसरू नका!” कारण ही लढाई सामान्यांच्या अस्तित्वाची नाहीच, ही लढाई आहे त्या 'किल्ली'साठीची; कारण ज्याच्या हातात किल्ली, त्याच्या हातात मुंबईची! रम्या घरी परतला, मुलगा अजूनही त्या पिगी बँकेकडे आशेने बघत होता. रम्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळूच पुटपुटला, “बाळा, ही बँक फोडण्याआधी फक्त एकच गोष्ट चेक कर... ही बँक तू तुझ्या कष्टाने भरली आहेस हे खरंय, पण ती फोडल्यावर जो आनंद होणार आहे, तो तुला मिळणार आहे की तुझ्या नावाने दुसऱ्याच कोणाची तरी आलिशान पार्टी होणार आहे?” मुलाला कदाचित त्याचं उत्तर मिळालं नसेल, पण मुंबईकरांनी आता हा प्रश्न स्वतःला विचारण्याची वेळ नक्कीच आली आहे. BMC is not a family business #notafamilybusiness
Continue watching