बीएमसीचा कोविड डेड बॉडी बॅग घोटाळा : महामारीत मृतांच्या टाळूवरचे लोणी कोणाच्या ताटात?
Articles"मुंबईवर कोविड-19 महामारीचे संकट कोसळले असताना, शहरातील हजारो कुटुंबे मृत्यूच्या छायेखाली जगत होती. रुग्णालयांच्या बाहेर ऑक्सिजनसाठी चाललेली धावपळ, स्मशानभूमींमधील अंत्यसंस्कारांच्या रांगा आणि दिवसेंदिवस वाढणारा मृत्यूचा आकडा—या सगळ्या भयावह वास्तवाच्या पार्श्वभूमीवर आज एक धक्कादायक कथित घोटाळा समोर आला आहे. बीएमसीच्या कोविड डेड बॉडी बॅग खरेदी प्रकरणात थेट नाव समोर आले आहे मातोश्रीच्या निकटवर्तीय आणि तत्कालीन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे. तपास यंत्रणांच्या आरोपानुसार, मृतांच्या अंतिम संस्कारासाठी लागणाऱ्या बॉडी बॅग्जवर अवाच्या सव्वा दर आकारून आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला. ‘मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे पाप’ या प्रकरणात घडले का, असा सवाल आज मुंबईकर विचारत आहेत. विशेष म्हणजे, बीएमसीवर सत्ता गाजवणाऱ्या एका परिवाराच्या राजकीय छत्रछायेखाली हा कथित भ्रष्ट व्यवहार घडतोय, त्यामुळे हा प्रकार केवळ आर्थिक नव्हे तर नैतिक अधःपतनाचा गंभीर आरोप ठरत आहे. कोविड-19 च्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान मृतदेह सुरक्षितपणे हाताळण्यासाठी डेड बॉडी बॅग्जची आवश्यकता होती, हे निर्विवाद आहे. मात्र या बॅग्ज बाजारात साधारणपणे पंधराशे ते दोन हजार रुपयांना उपलब्ध असताना, मुंबई महानगरपालिकेने त्या तब्बल सहा हजार सातशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति बॅग दराने खरेदी केल्याचा आरोप आहे. ही खरेदी बीएमसीच्या सेंट्रल प्रोक्योरमेंट विभागामार्फत करण्यात आली आणि याच व्यवहारातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, एका खासगी कंपनीने या बॉडी बॅग्ज सुमारे दोन हजार रुपयांच्या दराने पुरवल्या, तर त्या बॅग्ज मध्यस्थ कंपनीमार्फत थेट बीएमसीला तीनपट जास्त दराने विकल्या गेल्या. या दरफरकातून मोठा आर्थिक फायदा मिळवण्यात आला असून, या संपूर्ण व्यवहारात संगनमत, नियमबाह्य निर्णय आणि आपत्कालीन परिस्थितीचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. कोविड महामारीत शहर श्वासासाठी झगडत असताना, मृतदेहांच्या व्यवस्थापनावरही कमिशन संस्कृती चालू होती का, हा प्रश्न तपास यंत्रणांच्या चौकशीतून पुढे येत आहे. या कथित घोटाळ्यात केंद्रस्थानी असलेल्या किशोरी पेडणेकर त्या काळात मुंबईच्या प्रथम नागरिक होत्या. आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये, मे ते जून २०२० या कालावधीत सुमारे १२०० डेड बॉडी बॅग्जची खरेदी त्यांच्या आदेशाने किंवा दबावाखाली झाल्याचा उल्लेख आहे. डॉ. हरिदास राठोड यांना ठरावीक कंपनीकडूनच या बॅग्ज खरेदी करण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप तपासात पुढे आला आहे. यामुळे हा व्यवहार केवळ प्रशासकीय चूक नसून, राजकीय हस्तक्षेपातून घडलेला कथित गैरव्यवहार असल्याचा संशय बळावतो. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ऑगस्ट २०२३ मध्ये फसवणूक, गुन्हेगारी विश्वासघात आणि गुन्हेगारी कट या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान केवळ बॉडी बॅग्ज खरेदीपुरतेच नव्हे, तर कोविड काळातील मास्क, पीपीई किट्स आणि इतर वैद्यकीय साहित्य खरेदीतील व्यवहारांचाही पाठपुरावा केला जात आहे. यामागे एक व्यापक कोविड खरेदी घोटाळ्याची साखळी असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानेही हस्तक्षेप करीत मनी लॉण्डरिंगचा संशय व्यक्त केला आहे. ईडीच्या तपासानुसार, कोविड काळातील खरेदी व्यवहारांमधून मिळालेला कथित काळा पैसा वेगवेगळ्या मार्गांनी वळवण्यात आल्याचा संशय आहे. या अनुषंगाने किशोरी पेडणेकर यांची चौकशी करण्यात आली असून, तपास यंत्रणांनी त्यांची सुमारे बारा कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याचे समोर आले आहे. तपास यंत्रणांच्या मते, या व्यवहारातून सुमारे ४९.६३ लाख रुपयांचा थेट आर्थिक फायदा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांना अटकेपासून दिलासा दिला आहे. तपास पूर्ण होईपर्यंत कठोर कारवाई करू नये, तसेच अटक झाल्यास तात्काळ जामिनावर मुक्तता करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मात्र न्यायालयीन दिलासा म्हणजे निर्दोषत्व नव्हे, हेही तितकेच स्पष्ट आहे. तपास अद्यापि सुरू असून, अंतिम सत्य समोर यायचे बाकी आहे. या कथित घोटाळ्यामुळे एक मूलभूत प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बीएमसी ही मुंबईकरांची संस्था आहे की एखाद्या राजकीय परिवाराची जहागीर? महामारीत सामान्य मुंबईकर आपले प्रियजन गमावत असताना, त्याच काळात सत्तेच्या छत्राखाली मृतदेहांच्या व्यवस्थापनातून नफा कमावला गेला का, हा प्रश्न केवळ कायद्याचा नाही तर समाजाच्या नैतिकतेचा आहे. अद्यापि या प्रकरणात कोणताही दोष सिद्ध झालेला नाही आणि अंतिम निर्णय न्यायालय देईल. मात्र कोविड डेड बॉडी बॅग प्रकरणाने मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. सोबतच गेली कित्येक वर्षे बीएमसीवर राज्य करणाऱ्या एका परिवाराच्या छत्रछायेखाली घोटाळे घडताहेत. त्यामुळे या नेतृत्वाच्या प्रामाणिकतेवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिलेय. कोविड महामारीच्या काळात घेतलेले निर्णय आणि त्यामागील हेतू यांचा हिशेब मुंबईकर मागितल्याशिवाय राहणार नाहीत, कारण लक्षात ठेवा, मुंबई एका परिवाराची जहागीर नाही... BMC is not a family business #notafamilybusiness
Continue watching