मिठीच्या गाळात अडकलेल्या अभिनेता डिनो मोरियाचे मातोश्री कनेक्शन काय?
Articles"मिठी नदी गाळ काढणीच्या नावाखाली सुमारे ६५ कोटी ५४ लाख रुपयांचा कथित घोटाळा उघडकीस आला असून, या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून केतन कदम, जय जोशी आणि कंत्राटदार शेरसिंह राठौर यांची नावे समोर आली आहेत. विशेष म्हणजे या घोटाळ्यात संशयित म्हणून आदित्य ठाकरे यांचा मित्र आणि मातोश्रीचा निकटवर्तीय अभिनेता डिनो मोरिया याचं नाव पुढे आल्याने या प्रकरणाला केवळ आर्थिकच नव्हे, तर राजकीय छटादेखील लाभली आहे. पूरनियंत्रणासाठी दिलेला निधी प्रत्यक्ष कामाऐवजी कागदोपत्रीच वाहून गेला का, हा प्रश्न आज मुंबईकर विचारत आहेत. मुंबईची नैसर्गिक निचरा वाहिनी म्हणून ओळखली जाणारी मिठी नदी पवई आणि विहार तलावातून उगम पावते आणि तब्बल १८ किलोमीटरचा प्रवास करत माहीम खाडीत जाऊन मिळते. पावसाळ्यात शहरातील मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून नेण्याची जबाबदारी या नदीवर आहे. २००५ च्या महापुरानंतर मिठी नदीचे महत्त्व अधोरेखित झाले आणि गाळकाढणी हा पूरनियंत्रणाचा प्रमुख उपाय म्हणून पुढे आला. मात्र, या उपाययोजनेच्या नावाखालीच मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आता तपास यंत्रणांच्या निष्कर्षातून पुढे येतो आहे. २०१३ ते २०२१ या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेने मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी विविध कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांची देयके अदा केली. कागदोपत्री हजारो मेट्रिक टन गाळ उपसल्याचे दाखवण्यात आले. नदी पात्र स्वच्छ झाल्याचे अहवाल तयार झाले. मात्र प्रत्यक्षात प्रत्येक पावसाळ्यात मुंबई पुन:पुन्हा पाण्यात जात राहिली. याच विसंगतीतून या प्रकरणाचा तपास सुरू झाला. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने (SIT) आणि लेखापरीक्षण अहवालांनी तपासात धक्कादायक बाबी उघड केल्या. अनेक ठिकाणी प्रत्यक्ष गाळकाढणी न करताच काम पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले. बनावट जीपीएस डेटा, खोटे छायाचित्र, डुप्लिकेट नोंदी आणि बनावट वजन पावत्यांच्या आधारे बिले मंजूर करून घेण्यात आली. काही कामांमध्ये एकाच ठिकाणचा गाळ दोनदा दाखवून दुहेरी बिलिंग करण्यात आल्याचे पुरावेही तपासात समोर आले आहेत. तपासात असेही निष्पन्न झाले की या फुगवलेल्या बिलांना मंजुरी मिळावी यासाठी बीएमसीतील काही वरिष्ठ अभियंत्यांना महागड्या विमान तिकिटांपासून पंचतारांकित हॉटेल्समधील मुक्कामापर्यंत विविध ‘सुविधा’ देण्यात आल्या. रोख रकमेऐवजी अशा स्वरूपातील लाच देऊन व्यवहार झाकण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी केतन कदम याने बनावट डेटा असूनही बिले मंजूर करून घेण्यासाठी बीएमसीतील अधिकाऱ्यांशी संगनमत केल्याचा आरोप आहे. सहाय्यक अभियंता प्रशांत रामुगडे यांच्यावरही बनावट कागदपत्रे माहिती असूनही फुगवलेली देयके मंजूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हा घोटाळा केवळ कंत्राटदारांपुरता मर्यादित नसून, त्याला प्रशासकीय संरक्षण मिळाले का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणात अभिनेता डिनो मोरिया याचे नाव संशयित म्हणून समोर आल्याने तपासाला वेगळी दिशा मिळाली. मुंबई पोलिसांच्या तपासात केतन कदम आणि डिनो मोरिया तसेच त्याच्या भावामधील अनेक दूरध्वनी संभाषणांचे पुरावे हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय, डिनो मोरियाचा भाऊ सॅटिनो मोरिया आणि आरोपी केतन कदमची पत्नी पुनीता हे एकाच कंपनीत संचालक असल्याचे तपासात उघड झाले आहे. या कंपनीच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय असून, याच ओळखीतून महापालिकेतील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोच मिळवून दिली गेली का, याचा तपास सुरू आहे. पोलीस तपासानुसार, सध्या तरी डिनो मोरियाचा घोटाळ्याशी थेट संबंध सिद्ध झालेला नाही. मात्र, त्याची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात असून, चौकशी सुरू आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ आर्थिक गैरव्यवहारापुरते न राहता, राजकीय जवळीक, ओळखी आणि प्रभाव यांच्या आधारे व्यवस्थेचा गैरवापर झाला का, याकडे निर्देश करत आहे. मार्च २०२४ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेच्या एसआयटीने या प्रकरणात १३ व्यक्ती आणि संस्थांविरोधात गुन्हा दाखल केला. फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे आणि कट अशा गंभीर कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तपास सुरू असून अद्यापि कोणालाही दोषी ठरवण्यात आलेले नाही. मिठी नदी गाळकाढणी घोटाळ्याचा सर्वात गंभीर परिणाम मुंबईकरांना भोगावा लागत आहे. दर पावसाळ्यात तोच प्रश्न, तीच परिस्थिती आणि तीच असहायता. गाळ काढल्याचे अहवाल सादर होतात, कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचे दाखवले जाते, पण प्रत्यक्षात मुंबई पाण्यात बुडतेच. त्यामुळे हा निसर्गाचा कोप नसून, पूर व्यवस्थापनाच्या नावाखाली झालेल्या कथित फसवणुकीचा परिणाम असल्याचा आरोप अधिक तीव्र होत आहे. हा घोटाळा केवळ ६५ कोटी रुपयांपुरता मर्यादित नाही. तो बीएमसीतील कामकाज, पारदर्शकता आणि जबाबदारी यांवर गंभीर प्रश्न उपस्थित करतो. मुंबईकरांच्या जीविताशी खेळणाऱ्या अशा गैरव्यवहारांना राजकीय छत्रछाया मिळाली का, याचे उत्तर आता तपासातूनच मिळणार आहे. मुंबईकर मात्र आता गप्प बसणार नाहीत. कारण शेवटी एकच सत्य ठळक आहे— बीएमसी ही एका परिवाराची जहागीर नाही. BMC is not a family business #notafamilybusiness
Continue watching