हम दो, हमारे दो... परफेक्ट फॅमिली!
Articlesबाळ्या पाचवीत होता. शाळेतून फर्मान सुटलं होतं की उद्या 'आर्ट अँड क्राफ्ट'च्या तासाला कोलाज बनवून आणायचं आहे. अट एकच होती- "विषय करंट हवा आणि त्यात नवा-जुन्याचा संगम पाहिजे!" घरी आल्या आल्या बाळ्याने ओरडून विचारलं, "बाबा, कोलाज म्हणजे काय?" त्याचे बाबा, म्हणजे गबाळ्या, त्यावेळी उकडलेले बटाटे सोलण्यात मग्न होते. गबाळ्याचा आणि विचारांचा तसा दुरान्वये संबंध नव्हता. गल्लीतल्या नगरसेवक साहेबांच्या मेहरबानीने गबाळ्याच्या वडिलांनी वडापावची गाडी टाकली होती. वडील गेले आणि गबाळ्याने त्या गाडीचा 'वारसा' मोठ्या अभिमानाने स्वीकारला. गबाळ्याच्या चाळीभोवती टोलेजंग टॉवर उभे राहिले होते. टॉवरमधले लोक त्याला व्हॉट्सॲपवर ऑर्डर द्यायचे आणि तो नगरसेवकही येता-जाता त्याच्या वडापावची स्तुती करायचा. दर रविवारी गबाळ्या वीस वडापाव फुकट घेऊन नगरसेवकाकडे जायचा आणि विचारायचा, "साहेब, चाळीचं रिडेव्हलपमेंट कधी?" साहेब त्याच्या खांद्यावर हात ठेवून सांगायचे, "गबाळ्या, इलेक्शन होऊ दे रे, पहिल्यांदा तुमचीच चाळ पाडतो. मराठी माणसाने मुंबईत टिकलं पाहिजे,( मग ते चाळीत का असेना! )" गबाळ्याची बायको कावायची, "जेवढे वडापाव सायबाच्या पोटात फुकट घातले, तेवढ्यात विरारला स्वतःचं घर आलं असतं!" पण गबाळ्या 'ब्रँड'वर ठाम होता. "अस्मिता महत्त्वाची आहे, घर नाही!" गबाळ्या बायकोवर आता खवळला , म्हणाला - "आज विरारला बोलतेस, उद्या डहाणूला बोलशील, परवा गुजरातला बोलशील... मराठी माणूस मुंबईत टिकला पाहिजे!" तेवढ्यात बाळ्याने विचारलं, "बाबा, कोलाज कसं बनवू?" गबाळ्याने व्हॉट्सॲप सेनेच्या ग्रुपवर कोलाज कसे बनवायचे विचारले. लगेच सूचना आल्या- कातर घे, गम घे, नवे-जुने फोटो घे आणि चिकटव! गबाळ्याकडे रद्दीचा साठा भरपूर होता. त्याने हात धुतले आणि बाळ्यासोबत कोलाज बनवायला बसला. गबाळ्याने रद्दीतून पहिला फोटो काढला- त्याच्या 'एकमेव सायबाच्या' चिरंजीवाचा! गबाळ्याला सायबांचे शब्द आठवले, "माझ्यापाठी माझ्या मुलाला सांभाळा." गबाळ्याने स्वतःच्या मुलापेक्षा सायबाच्या मुलाला जास्त सांभाळलं होतं. त्याने तो फोटो सन्मानाने मधोमध चिकटवला. मग त्या बाजूला सायबाच्या नातवाचा फोटो चिकटवला. बाळ्या म्हणाला, "बाबा, टिचरने विषय 'करंट' घ्यायला, हा तर old age दिसतो!" अरे गप बाळ्या, हा तर आमचा युवा नेता आहे. पण बाळ्या म्हणाला हा ट्रेंडी नाही वाटत. टीचरने विषय करंट घ्यायला सांगितला आहे. गबाळ्याला आयडिया सुचली, "अरे, सध्या निवडणुका आहेत ना? या फोटोंच्या एका बाजूला मुंबई महानगरपालिकेचा (BMC) फोटो चिकटवू!" गबाळ्याने पालिकेचा फोटो कातरून चिकटवला. मग त्याला वाटलं, कायतरी कमी आहे. 'परफेक्ट फॅमिली' अजून पूर्ण झाली नाहीये. त्याने दुसऱ्या बाजूला सायबाच्या पुतण्याचा आणि पुतण्याच्या चिरंजीवाचा फोटोही चिकटवून टाकला. गबाळ्याने एकीकडे आपली परंपरा जपली आणि दुसरीकडे आपल्या सायबाची परंपराही एकाच कागदावर आणली. एकाच वंशावळीच्या दोन शाखा आता महानगरपालिकेला खेटून बसल्या होत्या. "बाबा, पण नवा-जुन्याचा संगम कुठेय?" बाळ्याने विचारलं. गबाळ्याने माळ्यावरून त्याच्या वडिलांच्या वेळची आणखी जुनी रद्दी काढली. तो शोधत होता, तोपर्यंत बाळ्याने स्वतःच एका जुन्या वर्तमानपत्रातली एक जाहिरात कापली आणि कोलाजच्या अगदी टॉपला हेडलाईनसारखी चिकटवली. बाळ्या जोरात ओरडला, "बाबा, झालं माझं कोलाज! बघा कसं दिसतंय!" गबाळ्याने चष्मा नीट करून कोलाज पाहिलं आणि त्याचा बटाटा सोललेला हात कपाळावर आदळला. बाळ्याने अगदी मध्यभागी त्या सर्व फोटोंच्या वर एक जुनी जाहिरात चिकटवली होती— "हम दो, हमारे दो!" पालिकेच्या आजूबाजूला ही 'परफेक्ट फॅमिली' पाहून गबाळ्याला घाम फुटला. बाळ्याने अगदी मार्मिकपणे साहेबांच्या घराण्याचं राजकारण एकाच घोषवाक्यात मांडलं होतं. दुसऱ्या दिवशी शाळेत टीचरने बाळ्याचं कोलाज पाहिलं आणि त्या कपाळाला हात लावून हसल्या. त्या म्हणाल्या, "बाळ्या, यात 'नवं' काहीच नाहीये रे! मुंबईत गेली तीस वर्षं हेच तर सुरू आहे... 'हम दो, हमारे दो' आणि आमचीच परफेक्ट फॅमिली! मुंबईच्या विकासाचा कोलाज यांना अजूनही बनवता आला नाही, फक्त 'फॅमिली फोटो' चिकटवत बसलेत! हा तर घराणेशाहीचा 'परंपरागत' कोलाज आहे!" BMC is not a family business #notafamilybusiness
Continue watching